25/03/2024
आमच्या गणपतीपुळ्याच्या पोस्ट पाहून तुम्हाला इथे यावंसं वाटलं हे पाहून छान वाटलं. इथे आमचा होम स्टे आहे. इथे राहून तुम्ही कायकाय करू शकता ते थोडं सुचवतो आहे. तुम्ही यातलं काहीही निवडू शकता. कोणत्याही हंगामात इथे आलात तरी भरपूर फिरण्यासारखं आहे. आमच्या होम स्टे ची माहिती कमेंट्समध्ये देतो आहे.
1. दिवस पहिला ः सकाळी गणपतीच्या डोंगराला प्रदक्षिणा आणि मंदिरात दर्शन. दुपारी प्राचीन कोकण सारख्या ठिकाणाला भेट. संध्याकाळी समुद्रावरचा सूर्यास्त. मंदिराच्या परिसरात कितीही गजबज असली तरी समुद्रावर उतरणाऱ्या कितीतरी शांत, सुंदर वाटा आहेत.
2. दिवस दुसरा ः मालगुंडला कवि केशवसूत स्मारकाला भेट. दुपारी 4 ते 5 जयगड लाइट हाऊस. संध्याकाळी मालगुंडच्या समुद्रावर पॅरासेलिंग, पॅरामोटरिंग अशा ॲॅडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंदही घेऊ शकता.
3. दिवस तिसरा ः आरेवारे च्या सुंदर कोस्टल वे ने रत्नागिरीला जाता येईल. रत्नागिरीला लोकमान्य टिळक जन्मभूमी, थिबा पॅलेस, पतित पावन मंदिर अशा ठिकाणांना भेट देऊन पुन्हा सनसेटच्या वेळेला आरे वारे कोस्टल वे ने गणपतीपुळ्याला येता येईल. याच दिवशी पावसलाही जाऊ शकता. तिथे स्वामी स्वरूपांनद यांची समाधी आहे.
4. दिवस चौथा ः जयगडहून फेरीबोटीने गुहागर, हेदवी, वेळणेश्वरला जाता येईल. सध्या कासवांच्या घरट्यांचा हंगाम आहे. गुहागरच्या किनाऱ्यावर रोज सकाळी आणि संध्याकाळी हॅचरीतून कासवांची पिल्लं समुद्रात सोडण्याचा सोहळा असतो. तोही पाहता येईल तुम्हाला. शिमग्याच्या दिवसात कोकणात खेळे येतात. ही लोककला पाहताना खरं कोकण बघता येईल.
5. दिवस पाचवा ः सकाळी लवकर निघून राजापूरजवळ बारसूच्या सड्यावर कातळशिल्पं पाहता येतील. तिथून येताना संध्याकाळी कशेळी चं सूर्यमंदिर आणि समुद्रातली घळ पाहू शकता.
6. दिवस सहावा ः मार्लेश्वरला शिवमंदिर आहे. पावसाळ्यात आलात तर इथला धबधबा आणि हिरव्यागार डोंगरांचा परिसर अनुभवण्यासारखा आहे.