19/02/2022
*छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण...?*
'छत्रपती शिवाजी महाराज की' म्हटल्यावर 'जय' म्हणायला आपल्याला विशेष काही करावं लागत नाही सगळं कसं आपोआपच निघतं. त्याच कारण म्हणजे असं की आपल्या राजानं स्वकर्तृत्वाच्या साक्षीने मावळ्यांच्या बळावर जे स्वराज्य स्थापन केलं ते होय, सध्याच्या काळात अनेक राजकारणी जरी आपल्याला आस्वस्थ करतही असतील की 'ते स्वराज्य' आपण आणूयात तरी देखील ते स्वराज्य येईल की नाही याची शाश्वती न घेतलेलीच बरी...
ज्या वयात आपण आपल्या फेसबुक वर खातं उघडतो व कधीही कामात न पडणारे हजारो मित्र सो कॉल्ड फेसबुक फ्रेंड गोळा करतो त्याच काळात आपल्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन मरेपर्यंत साथ देणारे मावळे गोळा केले, असे मावळे की जे स्वतःच्या मरणाला देखील घाबरणार नाहीत पण स्वराज्यावरचं संकट दूर करतील, आपल्या राजानं सांगितलेला शब्द हा त्यांच्यासाठी शेवटचा शब्द असेल..
राजाची जयंती मोठया उत्सवात साजरे करणारे तरुण तरुणी आपल्याला राजाच्या मिरवणुकीत 'शिला की जवानी' वर थिरकतांना दिसतात, एकीकडे राजाची मूर्ती अन एकीकडे मात्र अश्लील गाणे वाजवत आपण मिरवणूक काढतो...अरे आपल्या राजाच कार्यच एवढं मोठं होत की ते ३६५ दिवसही लोकांसमोर मांडलं तरी ते संपणार नाही, पण मग याचा अर्थ तो नाही की तुम्ही DJ वर कोणतंही गाणं लावलं आणि एक मिरवणूक काढली की झालं..मुळात आपण मिरवणुकीचा उद्देश व मिरवणूक काढतांना ती छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आहे याचा आपल्याला विसर पडता कामा नये.
आजकालची हौशी तरुण तरुणी आपल्या नावापुढे शिवश्री, राजे, शिवकन्या लावतांना दिसतात, तरुणांनो आपण खरचं आहोत का राजे..? तरुणींनो तुम्ही आहात का खरंच शिवकन्या...? काहीतरी ट्रेंड चाललाय म्हणून जर तुम्ही लावत असाल तर मग 'आपलं राजं' त्या ट्रेंड पुरतेच मर्यदित आहेत का...? मुळात नावापुढे एवढे मोठे शब्द लावत असतांना त्यांचा अर्थ, त्या पदवीच्या मागे असणारा गाभार्थ आपण कितपत अंगीकारला हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारलेला बरा..?
शिवाजी राजानां आदिलशहाच्या दरबारात मोठं स्थान मिळवण्यासाठी 'शहाजी राजांचा मुलगा शिवाजी' एवढं लेबल मात्र पुरेसे असतांना ते न स्वीकारता आपल्या रयतेसाठी त्यांचं स्वतःच एक स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय राजानं घेतला तेच उदाहरण जर आपल्याला आजच्या काळात द्यायचं झालं तर आपण नको तिथेही आपली ओळख दाखवून (सेटिंग लावून) होतो तेवढा स्वतःचा फायदा करून घेतो म्हणूनच मग आपल्याला शिवाजी राजे किती कळले तो प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
आपल्या आजच्या पिढीला शिवाजी महाराजांसोबत आठवतो तो भगवा झेंडा. आपण तो डोक्यावर घेऊन नाचतोही पण तो झेंडा हातात घेत असताना बाकी धर्मांना मात्र विसरलेलो असतो. हातात भगवा झेंडा घ्या पण तो झेंडा हातात घेतल्यावर त्याच कार्यक्षेत्र एवढं वाढवा की त्याच्या छताखाली सर्वधर्म सारखे झालेले असतील. सर्व धर्मांना त्यात समान स्थान असलेलं दिसू द्या. तरच आपण छत्रपतींनी सांगितलेल्या मार्गावर चालतोय असं म्हटल्या जाईल.
शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते घोडा तलवार व त्यावर बसलेले आपले राजे. आणि मग ते कोणाच्या विरोधात लढले...?? हे आपल्याला सहज सांगून मोकळे होता येईल मुळात ते महत्वाचे नाहीच त्यापेक्षा ते कशासाठी लढले व कोणासाठी लढले हे जास्त महत्वाचं. त्यांच्या मंत्रिमंडळात, आरमारात सगळ्या समाजाची लोकं आपल्याला दिसून येतात, त्या सर्व समाजाच्या लोकांशिवाय त्यांना आपलं स्वराज्य उभारता येणं शक्यच नव्हतं हा विचार लक्षात घेऊन आपण शिवाजी महाराज म्हणजे फक्त हिंदू धर्मापुरते मर्यादित न ठेवता त्यांना सर्व धर्माचे करण्यासाठी आपण आपल्यावतीने कसा प्रसार करता येईल ते ओळखुया म्हणजे तेव्हाच आपण शिवजयंती असो वा शिवराज्याभिषेक तो योग्यरीत्या साजरा करत आहोत असे म्हणणे उचित ठरेल...
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...
वऱ्हाडी नॉनव्हेज पार्सल पॉईंट अकोला