20/05/2017
हरिश्चंद्रगड – कचरा समस्या !!!!!!!!!
MAY 20, 2017 घाऱ्या LEAVE A COMMENT
हरिश्चंद्रगड – कचरा समस्या !!!!!!!!!
जरूर वाचा / विचार करा/
१५-२० वर्षांपूर्वी “हरिश्चंद्रगड” दुर्गम ठिकाण म्हणून स्वतःचे महत्व टिकवून होता.
गिरिभ्रमणाच्या निखळ भटकंतीत अश्या नितांत सुंदर ठिकाणी अचानक किल्ले पर्यटन,महोत्सव करणारे,या वाटेने-त्या वाटेने नेणारे,”बादल्या”उतरवून नवख्या मंडळींना आपण काही ग्रेट केल्याचा आनंद देणारे,events साजरे करणारे अनेक अट्टल आणि हौशे-गवशे व्यावसायिक हा हा म्हणता इथे गर्दी करू लागले.फेसबुक च्या माध्यमातून इथला थरार,हवा,धुके,ढग,इंद्रवज्र,रौद्र भीषणता विकली जाऊ लागली आणि या किल्ल्याची दहशत,आदर संपुष्टात आली..
भीषण शांत असलेला किल्ला आता १२ महिने गजबजून राहिला आहे.
इथे आलो नाही तर जीवाला मुक्ती नाही,समाजात मान नाही इतके हे ठिकाण व्यावसायिक पातळीवर विकले जाऊ लागले.
नुकताच पाचनई मार्गे हरिश्चंद्रगडावर जाऊन आलो.
इतक्या अडनिड्या ठिकाणी पूर्वी एवढीशी असलेली पायवाट आता सिंहगड सारखी दगड रचून -पायऱ्या करून भली मोठी केली आहे,सर्व खाचा-खळग्यात ,दरडी-ओढ्यात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या,कागद,स्टायरोफोमच्या ताटल्या विखरून पडल्या होत्या.
किल्यावर १-२ म्हणता म्हणता तब्बल १९-२० चहा-जेवण-तंबू निवासाची सोय करणाऱ्या,या – त्या वाटेने नेणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांच्या टपऱ्या झाल्या आहेत.ही मंडळी टपरीवर चहा जेवणाच्या सोयी करतात,ग्लास-ताटे धुण्यासाठी पाणी वाहून आणणे कष्टाचे असल्याने,जादा मनुष्यबळ लावणे शक्य नसल्याने प्लास्टिकचे,स्टायरोफोमचे ग्लास,ताटे वापरतात.याची विल्हेवाट लावणे -म्हणजे तो कचरा उचलून गडाखाली फेकणे किंवा फेकण्याचे “पाप”करायचे नसेल तर नुसतेच ठेवून देणे म्हणजे “वारा”जबाबदार!!!
कोकण कड्यात तर गारगोटीचे पांढरे खडक चमकतात की काय असे वाटेल एव्हढ्या मोठ्या प्रमाणात बाटल्या पडलेल्या आहेत.पूर्वी कोकण कड्याच्या पोटात वाहणारा वारा गवताची जुडी हवेत उडवली की ती अजून वर वर उडवत राह्यचा! आता एवढ्या संख्येने आलेले पर्यटक गवत उडवले नाही तर मुक्ती नाही मग गवत नसेल तर काहीतरी टाकलेच पाहिजे म्हणून स्वतःचा रुमाल न टाकता प्लास्टिकच्या बाटल्या,स्टायरोफोमचे ग्लास,ताटे उडवत असतील.
गिरिभ्रमणाच्या निखळ भटकंतीत अश्या नितांत सुंदर ठिकाणी किल्ले पर्यटन-महोत्सव करणारे,या वाटेने-त्या वाटेने नेणारे,”बादल्या”उतरवून नवख्या मंडळींना आपण काही ग्रेट केल्याचा आनंद देणारे,events साजरे करणारे अनेक अट्टल आणि हौशे-गवशे व्यावसायिक त्यांच्या प्रवाश्याला स्वतःचे ताट,वाटी,पेला,चमचा,पाण्याची बाटली आणणे “अत्यावश्यक” असे ठणकावून सांगत नाहीत(गाडी न भरण्याची भीती).आताशा स्टोव्ह,चुली मांडून एकत्र स्वयंपाक संपल्यात जमा आहे.(फालतू,जुने विचार- एवढा वेळ कुणाकडे आहे?ठिकाण नावावर लागले म्हणजे झाले!!!)त्यामुळे गडावर जेवण सांगितले की आपली जबाबदारी संपली.
या सर्वांनीच “स्थानिकांना रोजगार” अशी सामाजिक जबाबदारी घेतल्याने त्याचे पुण्य पदरात पडते. मात्र कमीत कमी कचरा,घाण होईल याची आपली जबाबदारी नाही का?
पानाचे पत्रावळ आणि द्रोण वापरले जातील यासाठी या पर्यटन प्रमुखांनी स्थानिकांना पटवले पाहिजे,आम्हाला प्लास्टिकचे,स्टायरोफोमचे ग्लास,ताटे देऊ नका हे सांगितले पाहिजे,आपणच जाताना पानाचे पत्रावळ आणि द्रोण घेऊन गेलो तर हळूहळू हा कचरा होणे कमी होईल.मात्र स्वतःचे ताट,वाटी,पेला,चमचा,पाण्याची बाटली आणणे “अत्यावश्यक” हीच शिस्त उपयोगी आहे त्यात आपले,निसर्गाचे भले आहे…
कोकण कड्याचा ध्यास घेतलेले,’बा कोकण कड्या’म्हणणारे,नितांत प्रेम असलेले अट्टल भटके,छायाचित्रकार,पर्यटन प्रमुख या वर काही ठोस विचार करतील -शिस्त बाळगतील तर एक नितांत सुंदर ठिकाण विद्रूप होण्यापासून वाचेल अशी आशा आहे.