26/09/2016
"मिसळ" - एक कमनीय बांध्याची प्रेयसी.
खाण्याच्या अत्यंत प्रिय अश्या असंख्य गोष्टींपैकी ‘मिसळ’ हा एक पुरोगामी महाराष्ट्रातला माझ्या अतोनात आवडीचा पदार्थ.
मिसळ हा फक्त एक खाण्याचा पदार्थ नसून तो एक विचार प्रवाह आहे असं माझं प्रांजळ मत आहे. म्हणजे पहा, जसं संत-वाङ्मय असतं, तसं जर पदार्थ-वाङ्मय असतं तर संत-वाङ्मया मध्ये तुकोबाच्या गाथेला जे सामाजिक स्थान आहे, तेच स्थान कदाचित मिसळीला पदार्थ-वाङ्मयामध्ये लाभल असतं.
म्हणजे विठठल जसा मूळचा विष्णुच, पण बहुजनांचा होतो तेंव्हा त्या विष्णूचा विठठल होतो आणि त्या विठठलाला स्पर्श करून भेटायचा अधिकार सगळ्यांना मिळतो. अगदी तस्साच कामगार वर्गातील बहुजनांपासून ते बाइक वरुन कॉलेजला जाणाऱ्या ( किंवा खरेतर कॉलेजला अजिबात न जाणाऱ्या ) उच्चभ्रू कुलीन मुलामुलींपर्यन्त सामाजिक एकात्मतेचा आणि समानतेचा विचारप्रवाह ह्या मिसळीने कित्येक वर्षे पसरवलेला आहे.
जागा वेगळी असेल, रेट्स वेगळे असतील, स्वछतेचि आणि हायजिनिकतेची मोजमापे वेगळी असतील पण, कुठेही खा मिसळ ही मिसळच राहणार.
मासोळीची स्किन चमकावी तशी तैलकांती ल्यालेली चमकणारी तर्री. कुणी 'कट' म्हणा, कुणी 'रस्सा'. शाब्दिक वर्णद्वेषात अडकणारी आमची मिसळ नव्हेच.
समोरच्या छोट्याश्या आयताकृती ताटली मधे ओसंडून वाहणारे फरसाण आणि त्यामधे हळूच अधून मधून डोकावणारे कोरड्या तळलेल्या खमंग चवीचे हवेहवेसे वाटणारे उसळीचे तळलेले दाणे. कांदा आणि कोथिंबीरीची एक नितांत सुंदर मैफिल. आणि त्या मैफिली मधला अत्युच्य क्षण म्हणजे 'छोट्याने' किंवा 'बारक्याने' त्या स्टीलच्या ठराविक आकार असलेल्या भांड्याच्या कानाला धरून मुक्तपणे डिश मधे ओतलेल्या तर्रीचा चटकदार वास आपल्या नाकपूड्यांशी जाऊन हितगुज करतो तो अनोखा क्षण. गरम गरम रश्याच्या वाफा चोफेर पसरतात. तुमची नजर ईकडेतिकडे आजुबाजूच्या डिश मधे आपल्या डिशशी तौलनिक अभ्यास करण्याच्या दृष्टीने भिरभिरते. पटकन, "अरे!, लिंबू राहिला की आपल्या ताटलीत...". मग ती पिवळसर हिरवी कांती लाभलेली बारिक्शी रसरशीत लिंबाची फोड येते. ती तर्जनि नि अंगठा या दोन्हीच्या मधे पकडायची आणि मस्त पैकी लिंबाच्या रसाचा शेवटचा थेंब डिश मधे निखळेस्तोवर पीळायची.
या सगळ्या भानगडीत कधीकाळी आठवड्या दोन आठवड्या पुर्वी चुकुनशा कापलेल्या बोटाच्या अर्धवट भरून आलेल्या आणि अर्धवट न भरलेल्या जखमेत तो लिंबाचा रस शिरतो आणि एक सणसणीत चरचरणारी कळ तुमच्या जिवाला भिडते. पण तिच्या कडे दुर्लक्ष करत आता पुढचा मिसळी चा 'उठाव' किंवा मिसळीचे 'बंड' आपल्याला हाका मारत असते.
पुढचे दहा पंधरा मिनिटं मग तहानभूक हरपून आपण त्या डिश मधल्या मिसळीचेच होऊन जातो. मिसळ हा एक पंथ आहे हे त्या मिसळीच्या पहिल्या घासा पासून ते शेवटच्या घासाबरोबर रुमालाने कपाळावरच्या टिपलेल्या थेंबा बरोबर आपल्याला उमगत जाते. आपण त्या मिसळ नामक पंथाचे पान्थस्थ बनून तिच्या अमूर्ततेत हरवून जातो.
मिसळ खाताना कोणते एटिकेट्स पाळावेत आणि कोणते नाहीत? ह्या विषयी अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन संदर्भ उपलब्ध आहेत. सगळे संदर्भ इथे देणे शक्य नाही. काही जे शक्य आहेत तेव्हढेच देतो.
शक्यतो मिसळ खायला गेल्यावर हॉटेल मधे, 'बिस्लरी' मागू नये. तुम्ही मिसळ नावाच्या आखाड्यातले नवखे आणि कच्चे खेळाडू आहात, ते मान्य करण्याची ती एक खूण आहे. लाल मातितला लालचुटूक लंगोट बांधलेला कुस्तीगीर आणि सिन्थेटिक मॅट वरचा मल्ल ह्यात जो फरक आहे, एग्ज़ॅक्ट्ली तोच फरक मिसळ खाताना बिस्लरी पाणी पिणे आणि हॉटेलातल्या लडबडणार्या टेबलावरती उभ्या असलेल्या जगातलं पाणी, पोचे आलेल्या ग्लासातून पिणे ह्या दोन क्रियांमधेही आहे. त्यातही तुम्ही जर ग्लासात पाणी बीणी न ओतत बसता, दीड दोन लिटरचा आक्खा जगच डाव्या हाताने उचलून आणि मान वर करून डायरेक्ट त्या जगानेच पाणी प्यायला लागलात घटा-घटा, तर तुम्हाला लोक एखादा हिंद केसरी कडे पाहावा तशा आदराने तुमच्या कडे पाहु लागतात.
मिसळ पावसाळ्यात खावी. मिसळ उन्हाळ्यात खावी. मिसळ थंडीत खावी. मिसळ कोणत्याही ऋतुत खावी. मिसळ ‘भर’ ऋतुत खावी, दोन ऋतूंच्या मधे खावी. मिसळ बसून खावी, उभ्या उभ्या खावी. “चला आज भरपूर वेळ आहे” म्हणून मिसळ खावी, किंवा आज आजिबात वेळ नाही म्हणूनही मिसळ खावी. आज काहीच 'विशेष' नाही म्हणून मिसळ खावी. किंवा आज 'कुछ खास बात है म्हणत' मिसळ खावी. मिसळ खाताना कोणतेच नियम पळायाचे नाहीत हाच फक्त पाळण्याचा एक नियम.