11/05/2018
#मालवणीडेझ
फार लहान असताना दर वर्षी गावी दोनदा जायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि गणपतीला.. कोकण रेल्वे वैगेरे चक्कर तेव्हा नव्हतं, तेव्हा आई आणि माझा प्रवास नेहमीच लाल डब्याने. गाडीत बसल्यावर ठरलेलं असायचं इंदापूर ला भजी, आणि राजापूर ला वडापाव. बऱ्याचदा आई जेवण बनवून सोबत घ्यायची पण ते फक्त संपवायचं म्हणून खायचो. बाकी जेवण म्हणजे भजी,वडापाव आलेपाक, लिमलेटच्या गोळ्या काय काय आणि काय काय...
12-14 तास झोकांड्या देत झोप घेत कणकवली आलं की हायस वाटायचं. गाव जवळ आलं या भावनेतून किंचितसा पोटात गोळा यायचा.
घराचं कुलूप उघडलं की आमचं मांजर जे बाकी वर्षभर आमच्या शेजाऱ्यांकडे राहायचं..ते घरी टुणकन उडी मारायचं..मग जितके दिवस घर उघड असेल तितके दिवस ते शेजाऱ्यांकडे फिरकायचं सुद्धा नाही. कसं कळतं ना मुक्या जनावराला! शेजारीही लटक्या रागाने "चाकरमान्यांका मुंबईक जाऊने मगे तुका बघतयं" अस हसत हसत लटके चिडायचे.
बरं, गावच्या घराला कुलूप असल्याने मुंबईतुन सगळं सामान न्यावं लागायचं(आजही लागतं)..सुटकेस वैगेरे प्रकार मला माहीतच नव्हता. सगळं सामान गोणत्यातून बांधून.. कपड्यांचा वेगळा गोणता, जेवणाच्या सामानाचा वेगळा असे 3-4 गोणते असत. ते गोणते सामान भरून करकचून बांधण्यापासून, उतरवण्यापर्यंत आणि मोकळे करण्याची सगळी जबाबदारी माझी असायची.
सामान तपासल्यानंतर त्यात काहीतरी विसरले असण्याचा प्रसंग नेहमीचाच. मग त्या गोष्टींची यादी करून ती जे शेजारीे बाजारात जाणार आहेत त्यांना दिली जायची.
दुसऱ्या दिवशी स्थिरस्थावर झालो की सकाळी सकाळी नदीवर अंघोळीला पळायचो कपडे आणि टॉवेल घेऊन...काहीजण असेच फक्त टॉवेल घेऊन (😂).. इच्छाच नसायची नदीतून बाहेर पडण्याची..बाहेर पडायचो फक्त चरचरून भूक लागल्यावर..तिथून पळत सुटलो की आमच्या शेजारी (आमचं मागचं घर, तिला मी बाई म्हणतो) ती तिच्या दोन मुलांना आणि मला जेवायला वाढायची. उकडा भात आणि निस्त्याक (उसळ)...त्या चुलीवरच्या जेवणाच्या तंद्रीमध्ये किती खाल्लं जायचं कळायचं नाही..आणि मग हात धुवून सारवलेल्या जमिनीच्या स्वाधीन व्हायचं.. मध्येच आई हाक मारायची मग बाई "निजलो हा हय, कित्या आराडतस?" म्हणून आईला गप्प करायची.मग उठल्यावर चाय, रवळीत ठेवलेली बिस्कीट आणि मग पत्ते.. मेंडीकोट मधला कोट खूपच seriously घ्यायचो.
कधी आई आणि माझा सोलं बनवण्याचा प्रोग्रॅम असायचा, मग रतांबे निवडून मग ते वेगळे करून त्यातल्या बिया वेगळ्या केल्या जायच्या. मग आघुळ (कोकम रस जो घट्ट असतो) काढल्या नंतर फोडलेली फळ सुकवायला खडकावर घेऊन जायचो. सुकवून आणली की पुन्हा त्यात आघुळ मुरवून पुन्हा सुकवायचं. अस 3-4 दा केल्यावर आपण ज्यांना मुंबईत कोकम म्हणतो ते मिळायचे.
रातांब्यांच्या बियांचे वेगळे पैसे मिळायचे.जे काय असतील किडुक मिडुक.
बिना चपलेचा गावभर हिंडायचो धावायचो कधी दगड टोचले नाहीत.कधी मासे पकडायला जायचो.खूप मज्जा यायची.
आमची पद्धत थोडी वेगळी होती किनाऱ्यावरून मासे पकडण्याची. अगोदर आम्ही गोठ्यात जाऊन जनावरांची पेंड घायचो. मग एक मोठ्ठ पातेलं(भांडं) घेऊन त्यावर एक कपडा बांधायचो आणि त्याला मधून भोक पडायचो. त्या हॉल मधून आत थोडीशी पेंड टाकायचो आणि मग पातेलं पाण्यात बुडवायचो. पेंडीच्या वासाने मासे बरोब्बर त्या भांड्या मधल्या भोकातून आत जायचे आणि मग आम्ही अलगद भांड उचलायचो. बिंगो...
जशी elephant सफारी असते तशी आमची 'म्हैस सफारी' असायची.थोडी जास्त चालली असती तर मी मुंबईत तिच्यावर बसूनच आलो असतो. गुरांना अंघोळीला घेऊन जायचो तेव्हा त्यांच्या पाठीवरून उडया मारायचो. मग "हैसून काय उडके मारतसं थयसून मार मगे मानतलयं" असे खत्री challenge दिले जायचे.
(ते थयसून म्हणजे झाडावर चढून डायरेक्ट नदीत उडी)
गोठ्यामध्ये फुटकी भांडी गोळा करून बँड वाजवायचो..असं करायचो तसं करायचो..तसं करायचो अस करायचो...अस इतकं लिहिण्यासारखं आहे की खंड लिहावे लागतील.
असं हृदयाच्या जवळची गोष्ट असली की लिहीताना कसं वाहवत जायला होतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.
कोकणात बालपण जगणं यासाठी खूप भाग्य असावं लागतं. त्या वेतोबा आणि चिटकेश्वराची कृपा आहे म्हणून सगळं चाललंय.
पण एक नक्की मी लहानपण जगलोय...
म्हणून तुम्ही पण या कोकणात अशी मजा अनुभवायला..
येवा, कोकण आपलोच आसा...❤
- प्रणिल
ता.क. कधी अननस खावेसे वाटले तर अंगणातून तोडून आणायचो आणि खायचो.. मस्तपैकी... नॉम नॉम करत...😂